चाकण (ता. खेड ) जवळील एकतानगर च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सन्मान माय माऊलींचा‘ या अनोख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने एकतानगर परिसरातील सर्व महिला भगिनिंना निमंत्रित करण्यात आले होते .यावेळी शाळेतील बालचमूंनी तालबद्ध टाळ्यांच्या गजरात महिलांचे स्वागत केले . तर शाळेतील महिला शिक्षकांनी उपस्थित भगिनींचे औक्षण करून स्वागत केले.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्या कामिनी परदेशी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. शाळेतील शिक्षक राजेंद्र मदगे, सुभाष गभाले व काळूराम ठाकूर यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मनोगतातून कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून दिला . तसेच स्वतः बनवलेली भेटकार्ड आपल्या आईला दिली. यामूळे सर्व माता महिला भगिनी भारावून गेल्या होत्या. शाळेतील महिला शिक्षिकांनी महिलांचे आरोग्य, झटपट पौष्टिक थाळी, वाचन चळवळ, अभ्यास कोपरा, हस्तकला, दैनंदिन व्यवहार, साक्षरता, मेहंदी, रांगोळी, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा व फक्त मुलगी अपत्य असणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
यानिमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील शिक्षिका सुवर्णा धादवड, अनिता कोल्हे, शितल थोरवे यांनी ‘बाईपण भारी देवा’ असा संदेश देणारी मेहंदी सर्व महिला पालकांच्या हातावर काढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुवर्णा धादवड यांनी केले तर आभार शितल थोरवे यांनी मानले .