प्रतिनिधि – दिपाली खिरड
चाकण जवळील पठारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गोर – गरीब आदिम आदिवासी कातकरी समाजाची एकूण साठ मुले मुली शिक्षण घेत आहेत. गरीबी व पालकांची अनास्था यामुळे या मुलांना नियमित व गरजेच्या वस्तूही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या वस्तीवर अजून कोणत्याच मुलभूत सुविधाही नाहीत. येथील मुलांचे पालक कधीच शाळेत न गेल्यामुळे त्यांच्याजळ आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड अशी महत्वाची कोणतीच कागदपत्रे नाहीत. त्यांना ना घरदार ना गाव ! माळरानावर अथवा ओढ्याकाठी झोपडी करून रहायचे व काबाडकष्ट करून मिळेल त्यावर गुजराण करायची. कागदपत्र अभावी ढीगभर समस्या असूनही अनेक शासकीय योजनांचा लाभही त्यांना घेता येत नाही. मात्र शिक्षण काळाची गरज आहे, हे ओळखून पठारवाडी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी या सर्व मुलांना शाळेत दाखल केले आहे.
मोहरे सरांनी मुलांसाठी समाजसहभागातून शालेय साहित्य, पूरक आहार, दप्तरे आदि साहीत्य मिळवून दिले आहे.
मात्र स्वच्छता व पाण्याअभावी या मुलांच्या वैयक्तिक आरोग्याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असते. कमालीचे दारिद्र, व्यसानाधिनता, अशिक्षितपणा व स्वच्छतेचा अभाव या गोष्टींमुळे मुले अनेकदा अंघोळ न करतात शाळेत येतात. कित्येक दिवस त्यांचे केस कापलेले नसतात. कपडेही धुतलेली नसतात. त्यामुळे वारंवार त्वचाविकार , कोंडा होणे, जखमा होणे, पोटदुखी, डोकेदुखी, व संसर्गजन्य आजार उद्भवतात. केस कापण्याकरीता त्या मुलांना सलूनमध्ये घेऊन जाणे श्यक्य नव्हते, म्हणूनच मोहरे सरांनी येथील सलून व्यावसायिक सिब्बू अली यांच्याशी संपर्क साधून या मुलांची व्यथा मांडली होती.
सिब्बू अली हे मुळचे उत्तर प्रदेशमधील बनारसचे ! परंतू व्यावसायानिमिन चाकण परिसरात ते स्थायिक झाले आहेत. व्यावसाय सांभाळून समाजकार्य करण्याची आवड असल्याने त्यांनी या कातकरी मुलांचे केस मोफत कापून देण्याचे तात्काळ मान्य केले. गेली तीन वर्षापासून अविरतपणे प्रत्येक महिन्याला शिब्बु अली शाळेत येतात व या विद्यार्थ्यांचे केस मोफत कापून देतात. यापुढेही या आदिवासी विद्यार्थ्यांचे केस मोफत कापणार असल्याचे अली यांनी सांगितले .त्यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
केसांची व्यवस्थित निगा राखली गेली , वेळच्यावेळी स्वच्छता केली, व्यवस्थित केस कापले तर डोक्यामध्ये कोंडा, जखमा, उवा, लिखा होत नाहीत त्वचाविकार होत नाहीत. शिवाय केसगळती थांबून चांगले घनदाट केस उगवण्यास मदत होते. येथील कातकरी मुलांचे नियमित केस कापल्याने त्यांच्या आरोग्याची स्वच्छता होऊन त्वचाविकार नाहीसे झाले आहेत. पालकांच्या खिशावरील आर्थिक भारही हलका झाला आहे. आज केस कापल्यानंतर सिब्बू अली यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले. गरीब व गरजूंना मदत केल्याने खूप समाधान मिळते असे शिब्बू अली सांगतात.