प्रतिनिधि – दिपाली खिरड
चाकण (ता.खेड) जवळील पठारवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रामीण भागात वाचन चळवळ रुजावी तसेच बालवयातच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होण्यासाठी मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी ‘श्यामची आई ‘या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. अनेकदा शालेय ग्रंथालयातील पुस्तके कित्येक दिवस कपाटात पडून असतात. सध्याच्या online व अभासी जगात पुस्तके वाचण्याकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. म्हणूनच त्यांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तके यावीत व त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून हा उपक्रम सुरु केल्याचे मनोहर मोहरे यांनी सांगितले. शालेय परीपाठानंतर अस्खलित वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरवी दहा-पंधरा मिनिटे हे वाचन रोज स्पीकरवर घेतले जाते. त्यामुळे विद्यार्थी तन्मयतेने ऐकतात.
यामुळे एकाग्रता वाढून त्यांच्या श्रवणक्षमतेचा विकास होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये धाडस व सभाधीटपणा, संभाषण कौशल्य, ओघवती रसाळ वाणी या गुणांचा विकास होण्यास मदत होईल. यापूढील काळात थोर क्रांतीकारक व महापुरुषांची आत्मचरित्रे तसेच प्रेरणादायी व संस्कारक्षम कथांच्या पुस्तकांचे वाचन केले जाणार असल्याचेही मोहरे यांनी सांगितले.