प्रतिनिधि – किशोर ठोसर
ता.१४ फेब्रुवारी २०२४.मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून तसेच राज्य सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेले आरक्षण तत्काळ लागू करावे या मागणीसाठी हिवरे तर्फे नारायणगाव, तालुका जुन्नर येथील तरुण राजेश सदाशिव भोर यांनी शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सदर उपोषणासाठी विविध राजकीय व्यक्ती तसेच जुन्नर तालुका आणि पंचक्रोशीतून विविध संस्था, तरुणांनी आणि सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांच्या वतीने पाठिंबा दिला आहे. राज्य शासनाने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून, काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात त्वरित रूपांतर व्हावे ही या उपोषणाची प्रमुख मागणी आहे. जो पर्यंत मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अंतरवली सराटी येथे सूरु राहील तोपर्यंत शिवजन्मभूमी जुन्नर येथेही उपोषण सुरूच राहणार असल्याचे राजेश भोर यांनी सांगितले.यासोबतच उपोषणकर्ते राजेश भोर यांची प्रकृती खालावत असून त्यांच्या जीवाला काही धोका उद्भवल्यास त्यास स्थानिक प्रतिनिधि, सरकार तसेच प्रशासन जबाबदार राहील अशी भावना राजेश भोर यांच्या मित्र परिवाराने व्यक्त केली आहे.