प्रतिनिधी – किशोर ठोसर
पुणे जिल्हा परिषद-पुणे तसेच पंचायत समिती आंबेगाव तालुका यांच्या वतीने ‘माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा, बुधवार दिनांक ०६ मार्च २०२४ रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळात संपन्न झाली. पुणे येथील ‘यशदा’ या संस्थेच्या वतीने व्याख्याते अजित कुमार देशपांडे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
आंबेगाव तालुक्याच्या बी.डी.ओ प्रमिला वाळुंज यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ समजून घेणे ही काळाची गरज असून, त्यादृष्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे तसेच जिल्हा सेवा अधिनियमाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे असे प्रतिपादन याप्रसंगी अजितकुमार देशपांडे यांनी केले.
आंबेगाव तालुका पंचायत समिती प्रशासन अधिकारी अनिल चासकर यांनी कार्यशाळेचे महत्व विशद करुन या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी विस्तार अधिकारी रंगनाथ हुजरे तसेच सागर कांबळे यांच्यासह आंबेगाव तालुका कृषी अधिकारी मनोज कोल्हे तसेच सहाय्यक बी.डी.ओ अर्चना कोल्हे यांच्यासह कनिष्ठ आणि वरिष्ठ सहाय्यक तसेच आंबेगाव तालुक्यातून सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.
आंबेगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष जयवंत मेंगडे यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केले.