घोडेगाव -पुणे (महाराष्ट्र) : निरंकारी ‘सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज’ आणि पूज्य निरंकारी राजपिताजी यांचे दिव्य मार्गदर्शन व पावन आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने सन् २०२१ मध्ये ‘वननेस वन’ नामक मेगा वृक्षारोपण परियोजना सुरु करण्यात आली. या परियोजनेचे लक्ष्य ‘समूह वृक्षारोपण’ (लघु वन) करुन त्याची देखभाल करणे हा होता. परिणामी आता दरवर्षी याचे स्वरूप विस्तारत चालले आहे.
संत निरंकारी मंडळाचे श्री. दत्तात्रय सातव यांनी माहिती देताना सांगितले, की सन् २०२१ मध्ये आयोजित ‘वननेस वन’ परियोजनेच्या पहिल्या टप्प्यात भवरापूर या ठिकाणी सुमारे १५००० वृक्षांची लागवड करण्यात आली. ज्या उत्साहाने निरंकारी भक्तांनी या वृक्षांचे रोपण केले त्याच उत्साहाने वर्षभर त्यांची देखभाल केली. परिणामी या ‘वृक्ष समूहांचा’ इतका विस्तार झाला आहे, की ते आता एक ‘लघु वनाचे’ रुप प्रदर्शित करत आहेत. या ‘वृक्ष समूहांकडे प्रवासी आकर्षित होत असून त्यांच्यावर दुर्लभ प्रजातीचे पक्षी पहायला मिळत आहेत, ज्यांचे अस्तित्व जवळपास संपत आले होते.
समाज कल्याणासाठी आवश्यक अशा या परियोजनेला क्रियान्वित ठेवण्यासाठी संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनमार्फत देशातील ग्रामीण व शहरी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये आणखी नवनवीन ठिकाणांचा समावेश करुन या महाअभियानाच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, ११ ऑगस्ट, २०२४ रोजी संपूर्ण भारतवर्षातील ६०० हून अधिक ठिकाणी ‘विशाल वृक्षारोपण अभियान’ रुपात केला जात आहे. यामध्ये मिशनचे समस्त अनुयायी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होऊन जवळपास १० लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. या अभियान अंतर्गत भवरापूर (ता.हवेली) या ठिकाणी ५००० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. पुढील ०३ ते ०५ वर्षांपर्यंत या प्रकल्पाची देखील देखभाल करण्यात येईल ज्यायोगे आधीच्या टप्प्यांप्रमाणेच हे वृक्षारोपण ‘लघु वनाच्या’ रुपात प्रफुल्लीत होऊ शकेल. या अभियानासाठी स्थानिक ग्रामपंचायत आणि नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले.