
दिनांक १६/८/२०२५ रोजी सराईत गुन्हेगार वेदांत शांताराम आरूडे रा. कळंब तालुका आंबेगाव जि पुणे, महेश दत्तात्रय मंगळवेढेकर, रा. मंचर तालुका आंबेगाव जि पुणे, अभिनीत सोमनाथ बिडकर रा. जुना बैलबाजार, मंचर ता. आंबेगाव जि पुणे हे तिघेजण सातारा शहरात घरफोडी चोरी करण्यासाठी गेले होते.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – मंचर
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सातारा शहरातील महामार्गा जवळच असणाऱ्या वास्तू प्लाझा या अपार्टमेंटमध्ये चोरी करण्यासाठी पहाटे साडे तीन वाजता तिघेजण शिरले. त्यांनी पहिल्यांदा इमारतीतील प्रत्येक फ्लॅटचा दरवाजांना बाहेरून कड्या घालून बंद केले. त्यानंतर बंद असलेले 2 फ्लॅट फोडले. त्यामधील सोने, काही रक्कम घेतली. पुढे तिसरा फ्लॅट फोडताना मोठा आवाज आला. त्यामुळे सुट्टीवर घरी आलेल्या, फ्लॅटमध्ये असणाऱ्या जवानाला जाग आली. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण बाहेरून कडी होती. जावणाच्या पत्नीने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला. तोच जवानाच्या डोक्यात लोखंडी कटावणीने एका चोरट्याने हल्ला केला.इतकंच सगळं घडलं असताना भारतीय जवान थांबले नाहीत, त्यांनी जखमी अवस्थेत त्या चोरट्यांचा पाठलाग केला.
दरम्यान मोठ्याने आवाज आल्यावर आजुबाजुचे लोक जागे झाले. इमारतीच्या दिशेने येऊ लागले असता दोघे चोर भांबावले. वेदांत आरूडे हा इमारतीचे टेरेसवर पळत गेला आणि चौथ्या मजल्यावरून भिंतीवरील पाईपच्या साह्याने खाली उतरु लागला, तोच त्याचा हात निसटला आणि खाली पार्किंग केलेल्या गाडीवर पडला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर महेश मंगळवेढेकर याला सोसायटीतील लोकांनी इमारतीमध्येच पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. हे दोघेजण चोरी करण्यासाठी गेले असता त्यांचा मित्र अभिजीत बिडकर हा लक्ष ठेवण्यासाठी इमारतीचे खाली थांबलेला होता. आपल्या सहकाऱ्यांना रहिवाशांनी पकडून ठेवल्याची चाहूल लागताच अभिजीत बिडकर हा घटनास्थळावरून फरार झाला.
तर सदर घटनेबाबत सातारा शहर पोलीस स्टेशन यांनी गुन्हा रजिस्टर नं. ६८३/२०२५, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३०७, ३०९(२), ३११, ३११(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.दाखल गुन्हयातील फरारी आरोपी नामे अभिजीत बिडकर हा फरारी झालेला असून त्याचा मंचर पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेण्यात यावा असे सातारा शहर पोलीस स्टेशन यांनी फोनव्दारे कळविल्याने मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ, यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार नाडेकर, पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, हनूमंत ढोबळे यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून फरारी आरोपीचा शोध घेणेबाबत सांगितल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी फरारी आरोपीचा शोध घेत असताना फरारी आरोपी हा मंचर पोलीस स्टेशन हद्दीत भोरवाडी फाटा येथे पुणे नाशिक हायवे रोडवर खेड बाजूकडून येत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सातारा येथे एका इमारतीमध्ये चोरी केल्याचे सांगून गुन्हयाची कबूली दिली आहे. सदर आरोपीस पुढील तपासकामी सातारा शहर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सातारा शहर पोलीस स्टेशन करीत आहेत.सदरची कामगिरी श्री संदिप गिल्ल, मा. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री अमोल मांडवे मा उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड, श्रीकांत कंकाळ पोलीस निरीक्षक मंचर पोलीस स्टेशन पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पोलीस हवालदार नाडेकर, पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, हनूमंत ढोबळे यांनी केली आहे.
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇


