
जुन्या मैत्रीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत शेतीच्या कामाचे बहाणे करून नेलेला तब्बल १६ लाख रुपये किमतीचा जेसीबी परस्पर लपवून आर्थिक नुकसान व विश्वासघात केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी सखाराम कुशाबा दगडे (रा. बोरघर आवळेवाडी, ता. आंबेगाव, सध्या रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात नवनाथ किसन भागीत यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २० जून २०२६ रोजी दाखल झालेल्या फिर्यादीवरून, तक्रारदार नवनाथ भागीत हे शेती व बांधकाम व्यवसाय (काँट्रॅक्टर) करतात. सन २०१९ मध्ये आरोपी सखाराम दगडे याच्या घराचे बांधकाम करताना फिर्यादी यांची त्याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर २०२० मध्ये भागीत यांनी स्वतःचा जेसीबी खरेदी केला. या खरेदीसाठी आरोपी याने त्यांना काही आर्थिक मदत केली होती. त्या बदल्यात फिर्यादी यांनी ठरलेल्या करारानुसार सलग पाच वर्षे, दरवर्षी दोन महिने आरोपी सखाराम दगडे याला त्याच्या शेतीच्या कामासाठी मोफत जेसीबी वापरण्यास दिला होता. जानेवारी २०२५ मध्ये हा दोघांमधील ठरलेला व्यवहार व करार पूर्ण झाला होता.
असा केला विश्वासघात
सर्व व्यवहार पूर्ण झालेला असतानाही, दि. ९ मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आरोपी सखाराम दगडे हा पोखरी येथील फिर्यादी यांच्या हॉटेल समोर आला. त्याने “मला शेतीचे काम करायचे आहे, काही दिवसांसाठी तुझा जेसीबी दे,” अशी गळ फिर्यादी यांना घातली. जुन्या मैत्रीचे संबंध असल्याने फिर्यादी यांनी तात्काळ आपला जेसीबी (क्रमांक एम.एच.१४ जे.ए.६१७५) चालक तोत्रे याच्यासोबत आरोपीच्या बोरघर येथील घरी पाठवून दिला.
घराला कुलूप लावून जेसीबी लपवला
मात्र अनेक दिवस उलटूनही आरोपीने जेसीबी परत न केल्याने भागीत यांनी फोनवर व प्रत्यक्ष भेटून विचारणा केली. तर आरोपी दगडे याने दरवेळी काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ केली. फिर्यादी भागीत यांनी आरोपीच्या बोरघर येथील घरी जाऊन खात्री केली असता, आरोपी दगडे याने जेसीबी घराच्या वॉल कंपाऊंडच्या आत लावून दरवाजाला कुलूप लावले होते. त्यानंतर भागीत यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये घोडेगाव पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यावेळी आरोपीने “पोलिसांमधील अर्ज मागे घे, मी तुझा जेसीबी आणून देतो,” असे सांगून पुन्हा विश्वास संपादन केला व तक्रार मागे घेण्यास भाग पाडले.
तक्रार मागे घेतल्यानंतरही आरोपीने जेसीबी परत न करता तो स्वतःच्या फायद्यासाठी कुठेतरी अज्ञात स्थळी लपवून ठेवला आणि भागीत यांचा फोन उचलणेही बंद केले. अखेर आपली फसवणूक आणि विश्वासघात झाल्याची खात्री पटल्यानंतर नवनाथ भागीत यांनी घोडेगाव पोलिसांत रीतसर फिर्याद नोंदवली. पोलिसांनी आरोपी सखाराम दगडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१६ (२) आणि ३२४ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर पवार यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश पवार हे करत आहेत.

