
मैत्रिणीच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची चैन अन त्यातील गणपतीचे पेंडल पाहण्यासाठी मित्राने तिच्याकडे मागितले, स्वतःच्या गळ्यात घातले आणि मी पण अशीच सोन्याची चैन गणपतीचे पेंडल बनवणार असे म्हणला आणि मैत्रिणीला गाडीतून खाली उतरून दिले अन मित्र गाडी घेऊन झाला पसार ही घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ओमरुद्र कॉलनीच्या आवारात. या बाबतची तक्रार फिर्यादी शुभांगी विजय काळे हिने तिचा मित्र पावन अंबादास सुरवसे रा.डिसलेवाडी जामखेड ता.कर्जत याचेवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – शिरूर
घटनेची मिळालेली सविस्तर माहिती अशी की, इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी झाली ओळख अन त्याचे रुपांतर झाले मैत्रीत, त्यांनतर दिनांक 24/7/2025 रोजी सकाळी दहा वाजायचे सुमारास आरोपी पवन अंबादास सुरवसे याने त्याची मैत्रीण फिर्यादी शुभांगी काळे हिला फोन करून कळविले की तुझे व माझे मित्र आणि मैत्रिणी घेऊन लोणावळ्याला फिरायला जाऊ त्यावर काळे म्हणाल्या ठीक आहे. त्यानंतर काळे यांनी त्यांच्या मैत्रिणीला फोन करून फिरायला जाणे बाबत कळविले आणि फोन बंद केला.
त्यानंतर दुपारी दोन वाजताची सुमारास पवन सुरवसे हा त्याची वॉल्स वॅगन कंपनीची पोलो चार चाकी गाडी नंबर एम एच 17 ए एच 9900 ही गाडी घेऊन आला त्या गाडीमध्ये फिर्यादी काळे तसेच तिची मैत्रीण दीपिका घोंगडे आणि आरोपी पवन सुरवसे, तर मित्र शुभम गद्रे असे चौघेजण गाडीत बसलो आणि शिरूर येथून प्रवास चालू केला तर लोणावळा येथे सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास पोहोचले.
चारही मित्र-मैत्रिणी दोन दिवस लोणावळा या ठिकाणी होते. मात्र दिनांक 26/7/2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजेची सुमारास लोणावळा येथून राहत असणाऱ्या गावी शिरूर या ठिकाणी येत असताना सुरवसे याचा शुभम गद्रे मित्र त्याला कारेगाव मध्ये सोडले त्यानंतर फिर्यादी काळे यांची मैत्रीण दीपिका घोंगडे तिला तिच्या घराजवळ सोडले शेवटी फिर्यादी शुभांगी काळे यांच्या घरासमोर सकाळी साडेअकरा वाजता गाडी पोहोचली काळे ही गाडीत ड्रायव्हर सीट चे बाजूला बसली होती.
त्यातच पवन सुरवसे याची काळे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन त्यामध्ये असलेले गणपतीचे पेंडल याकडे नजर गेली आणि सुरवसे याने ते पाहण्यासाठी मागितले, त्याच्या शब्दावर काळे यांनी विश्वास ठेवला आणि गळ्यातील चैन पेंडल त्याला पाहण्यासाठी काढून दिले, त्यानंतर सुरवसे काळे यांना बोलला की मी पण अशीच सोन्याची चैन गणपतीच पेंडल बनवणार आहे, माझ्या गळ्यात कसे दिसते असे म्हणून सुरवसे याने ते स्वतःच्या गळ्यात घातले.
त्यानंतर फिर्यादी शुभांगी काळे हिने गाडीतून खाली उतरून सुरवसे याच्याकडे चैन आणि पेंडल मागणार तितक्यातच सुरवसे याने गाडी चालू केली आणि निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी सुरवसे याला फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने काळे यांचा फोन उचलला नाही. त्यानंतर फिर्यांनी यांनी आजपर्यंत पवन सुरवसे याला वेळोवेळी फोन करून त्याच्याकडे असलेली सोन्याची चैन आणि त्यातील गणपतीचे पेंडल मागितले असता त्याने परत दिले नाही.
त्यानंतर फिर्यादी काळे यांना समजले की पवन सुरवसे यानी मैत्रीचा फायदा विश्वासघात केल्याचे समजले त्यानंतर फिर्यादी काळे हिने शिरूर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली आणि तक्रार दिली त्यानंतर शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार नानासाहेब जगताप यांनी घडलेल्या गुन्ह्याची कसून चौकशी करून पवन सुरवसे याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 316(2) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर घडलेल्या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.


