
पिकअप गाडी शाळेतील आवारात वळवत असताना तेथे उभे असलेल्या कारला घासल्याचे, त्या कार मधील महिलेला सांगितलेच्या कारणावरून शेतात जाऊन शिविगाळ दमदाटी करून डोक्यामध्ये कोयत्याने वार केल्याची घटना गोहे बुद्रुक पाडळवाडी येथे घडली असून याबाबतची तक्रार फिर्यादी राजेंद्र बुधाजी तळपे रा. गोहे बु (पाडळवाडी), ता आंबेगाव जि पुणे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनला दिली असून त्यानुसार मनोहर रामचंद्र गेंगजे व त्यांचा मुलगा सक्षम मनोहर गेंगजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – घोडेगाव
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक पाडळवाडी येथे एक महिन्यापूर्वी फिर्यादी हे गावातीलच तुळसाबाई यांचे शेतात औत घेऊन गेले होते तेंव्हा गावातील जिल्हा परिषद शाळेतील परिसरात एक चार चाकी कार उभी होती त्यावेळी आरोपी सक्षम मनोहर गेंगजे यांनी त्याच्याकडे असणारी पिकअप गाडी शाळेतील आवारात वळवत असताना त्या पिकअप गाडीने कारला घासले आणि निघून गेला. मात्र त्या ठिकाणी कार मधील असणाऱ्या महिलेने फिर्यादी हे त्या ठिकानाहून जात असताना त्यांना विचारले असता फिर्यादी यांनी सांगितले की कारला पिकअप गाडी घासली आहे.
मात्र गाडी घासलेले सांगितलेचा राग मनात धरून आरोपी सक्षम मनोहर गेंगजे यांनी फिर्यादी यांना फोन करून ‘‘ माझे नाव का सांगितले ❓ तू गावात भेट, तुझे हात पाय मोडतो ’’ अशी धमकी दिली.
त्यानंतर दिनांक 8/8/2025 रोजी दुपारी दीड वाजण्याचे सुमारास फिर्यादी हे भागूजी कुऱ्हाडे यांच्या शेतामध्ये भाताचे रोप काढत असताना आरोपी मनोहर रामचंद्र गेंगजे यांनी फिर्यादी यांना हाक मारून, मधुकर पांडू तळपे यांचे शेताचे बांधावर बोलावून घेतले. त्यावेळी आरोपी मनोहर गेंगजे फिर्यादी रामचंद्र तळपे यास म्हणाला की, तू माझ्या मुलाने (म्हणजेच आरोपी सक्षम) शाळेतील आवारात उभी असलेली त्या महिलेच्या कार ला पिकअप गाडी घासलेली पाहिली आहे का ❓तुझ्याकडे काही पुरावा आहे का ❓ असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी केली.
तर आरोपी सक्षम हा बाजूला उभा असलेल्या ठिकावरून हातात लोखंडी कोयता घेऊन फिर्यादी यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या बाजूने पळत आला, आणि हातातील असणाऱ्या कोयत्याने फिर्यादी यांचे डोक्याच्या मध्यभागी वार केले, त्यानंतर फिर्यादी यांचे डोक्यातून रक्त आले आणि फिर्यादी हे जमिनीवर बेशुद्ध पडले.
सदर घडलेली घटना कळल्यानंतर फिर्यादी यांना बेशुद्ध अवस्थेतच फिर्यादी यांचे मेहुणे नवनाथ कुऱ्हाडे तसेच फिर्यादी यांचे वडील बुधाजी तळपे तसेच किसन तळपे यांनी फिर्यादी यांचे चार चाकी गाडीतून घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यासाठी आणले आणि त्यांच्यावर डॉक्टरांनी तात्काळ उपचार चालू केले. मात्र काही वेळाने फिर्यादी हे शुद्धीवर आले नंतर घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घडलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पवार व त्यांचे सहकारी करत आहेत.


