
घाणेरडी भाषा वापरून महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
स्वराज्य संवाद – प्रतिनिधी
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २४/९/२०२४ रोजी सकाळी ८:४५ वाजेचे सुमारास जुन्नर तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत फिर्यादी पीडित महिला व तिचे पती तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थितीत असताना घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई या ठिकाणी आले. सकाळची शाळेतील प्रार्थना झाल्यानंतर देसाई यांनी सर्व शिक्षक यांना मुख्याध्यापक केबिनमध्ये बोलावून घेतले त्यानंतर सर्वांमध्ये काही चर्चा झाल्या आणि त्या चर्चेमधून देसाई यांनी “तुम्ही लय माजलेत आता, एके एकाची चांगलीच वाजवतो”. ❗ अशी अत्यंत घाणेरडी अर्वाच्य व अश्लील भाषा वापरून महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

त्यानंतर आरोपी हे फिर्यादी शिकवत असलेल्या वर्गात आले व तिच्याकडे घाणेरड्या नजरेने बघत फिर्यादी यांना त्यांचे पतीचे नाव काय आहे असे विचारले ? त्यानंतर पीडित फिर्यादी महिला यांनी त्यांचे पतीचे नाव सांगितले ते नाव आरोपी देसाई यांनी कागदावर लिहून घेतले. मात्र त्यानंतर देसाई यांनी त्यांचे पदाचा गैरवापर करून पीडित महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली.
सदर आरोपी देसाई हे घाणेरड्या विचाराने पूर्णपणे पीडित महिलेच्या मागे लागल्यामुळे सदर पीडित महिलेने जुन्नर पोलीस ठाणे गाठले आणि जुन्नर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना सविस्तर घडलेली घटना सांगितली, त्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच सदरचा तपास स.पो.नी. गटकुळ यांच्याकडे देण्यात आला सर्व घटनेची शहानिशा करून सहाय्यक फौजदार गिजरे यांनी फिर्यादीचे तक्रारी वरून सदरचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सपोनी गटकुळ यांचे सह त्यांचे सहकारी करत आहेत.
व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇


