
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरील अवसरी खुर्द येथील तांबडेमळा गावच्या हद्दीत पेठ अवसरी घाटा मधील ऋषी पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर चार जणांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखूनन अंदाजे दोन लाख रुपयांची रक्कम पळवून नेल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
स्वराज्य संवाद – मंचर
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजायच्या सुमारास पेट्रोल पंपावर दोन कामगार व एक मॅनेजर काम करत होते. त्याच वेळेस खेड दिशेकडून पेट्रोल पंपाच्या बाहेर उजव्या साईडला दरोडेखोरांनी मोटार सायकल उभी करून सदर चोरटे पेट्रोल पंपाची पाहाणी करत असल्याचे सीसीटीव्ही कैद झाले.
त्यानंतर त्यातीलच तीन दरोडेखोर केबिन जवळ असणाऱ्या डाव्या साईटला बाथरूमच्या दिशेला गेले आणि पुन्हा माघारी फिरले, आणि केबिनमध्ये येऊन मॅनेजरला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून ‘तुझ्या काउंटर मध्ये असणारी सर्व कॅश आम्हाला दे’ असे म्हणाले, त्याच दरम्यान केबिन मध्ये एक कामगार आला आणि दरोडेखोर व त्याच्यात झटापट झाली. तर दरोडेखोरांमधील निळसर कलरचा शर्ट घातलेल्या एकाने मॅनेजरला गावठी कट्टा दाखवून स्वतः पैशाचा ड्रॉवर बाहेर ओढून त्यामधून अंदाजे दोन लाख रुपये नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
त्यानंतर तिघेही दरोडेखोर बाहेर पळाले आणि बाहेरच अगोदर एक जण दुचाकी चालू करून गाडीवर बसला होता त्या मोटरसायकलवर सर्व चोरटे बसून नारायणगावच्या दिशेने पळून जात असताना शिवनेरी हॉटेल समोर एक जण गाडीवरून खाली पडला, तर कामगार त्याला पकडन्यासाठी जवळ येत असल्याचे पाहून त्याने स्वताचे बचावासाठी हवेत गोळीबार केला त्यामुळे पकडण्यासाठी येणारे कामगार घाबरले, अश्यातच पुन्हा ते दरोडेखोर गाडीवर बसून पळून गेले.
दरम्यान सदर घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ मंचर पोलीस स्टेशन यांना कळविली, तर लागलीच मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांच्यासह त्यांची सर्व टीम तांबडेमळा येथील ऋषी पेट्रोल पंपावर आले, सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर दरोडेखोर ज्या दिशेला पळून गेले त्या दिशेला शोध चालू केला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्यासह त्यांची सर्व टीम देखील ऋषी पेट्रोल पंपावर तात्काळ दाखल झाली, सदर पेट्रोल पंपावरील घडलेल्या घटनेची माहिती ही सर्व पोलीस स्टेशनला देऊन दरोडेखोरांचा शोध घेण्यास सांगितले. सदर घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.


