WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

पुणे जिल्ह्यात खळबळ: २ लाखांची लाच घेताना जुन्नर – आंबेगावचे प्रांत अधिकारी व लिपिक एसीबीच्या जाळ्यात

मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू; महसूल विभागात मोठी खळबळ

स्वराज्य संवाद – ज्ञानेश्वर खिरड
टाऊन प्लॅनिंगच्या कामात सहकार्य करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना जुन्नर-आंबेगाव विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचे लिपिक खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील एका तक्रारदाराचे टाऊन प्लॅनिंग संबंधित काम प्रांत कार्यालयात प्रलंबित होते. हे काम मार्गी लावण्यासाठी तक्रारदाराने वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवले, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून कामात टाळाटाळ केली जात होती. अखेर हे काम पूर्ण करून देण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली. चर्चेअंती २ लाख रुपयांवर तडजोड झाली.

एसीबीचा असा पडला विळखा
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने तात्काळ पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची शहानिशा करून गुरुवारी दुपारी प्रांत कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार २ लाख रुपये घेऊन कार्यालयात पोहोचला. ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने गोविंद शिंदे आणि लिपिक खैरनार यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

मंचर पोलिसांत गुन्हा दाखल
या कारवाईनंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत. एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात ही चर्चेची मोठी घटना ठरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!