
पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाचखोर पोलिसांविरुद्ध लागोपाठ दोन मोठ्या कारवाया करत शिरूर पोलीस दलाला मोठा हादरा दिला आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४ वर्ष) आणि पोलीस हवालदार सतीश नाथाराव मुंडे (वय ४५ वर्ष) हे दोन्ही अधिकारी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. या कारवाईदरम्यान हवालदार सतीश मुंडे हे लाचेची रक्कम घेऊन फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
प्रतिनिधी – दिपाली खिरड
या दोन्ही धडक कारवायांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
पहिली कारवाई: ११ हजारांची लाच घेताना हवालदार शिवाजी बनकर रंगेहाथ अटक
- आरोपी :शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४ वर्षे, पद- पोलीस हवालदार, वर्ग ३).
- लाचेचे कारण :२९ वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या आई-वडिलांवर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस (BNS) कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी बनकर यांनी १५,०००/- रुपयांची लाच मागितली होती.
- कारवाईची सविस्तर माहिती: आरोपी बनकर यांनी तक्रारदाराकडून आधीच ५,०००/- रुपये घेतले होते. उर्वरित ११,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २१:३३ वाजता त्यांना शिरूर पोलीस स्टेशनच्या आवारात रस्त्याच्या कडेला रंगेहाथ अटक करण्यात आली.
दुसरी कारवाई: ९५ हजारांची लाच स्वीकारून हवालदार सतीश मुंडे फरार
- आरोपी: सतीश नाथाराव मुंडे (वय ४५ वर्षे, पद- पोलीस हवालदार, वर्ग ३).
- लाचेचे कारण: एका ५९ वर्षीय तक्रारदाराच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १२६(२), ३०३(२), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार सतीश मुंडे करत होते. दाखल गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाला अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी मुंडे यांनी सुरुवातीला चक्क १,००,०००/- (एक लाख) रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोडीअंती ९५,०००/- रुपये घेण्याचे ठरले.
- कारवाईची सविस्तर माहिती: तक्रारदाराच्या तक्रारीवरून ३० सप्टेंबर २०२६ रोजी शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ‘टाकळी हाजी पोलीस चौकी’ येथे लाचेच्या सापळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हवालदार सतीश मुंडे यांनी पंचांसमक्ष ९५,०००/- रुपयांची लाच स्वीकारली. मात्र, त्याच वेळी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याची चाहूल लागली. याचाच गैरफायदा घेत आरोपी सतीश मुंडे लाचेची ९५,०००/- रुपयांची रक्कम घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल
या दोन्ही प्रकरणांत लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ आणि बीएनएस कलम २३८ अन्वये गुन्हे दाखल झाला आहे.
या अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
या दोन्ही कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
पहिल्या कारवाईचे पथक
पोलीस उप अधीक्षक श्री. सतीश बाळके (पर्यवेक्षण अधिकारी), पोलीस निरीक्षक श्रीमती आसवारी शेंडगे (सापळा अधिकारी) आणि अंमलदार आश्विन कमकर, विकास आडसूळ व वामन सोनवणे.
दुसऱ्या कारवाईचे पथक
पोलीस उप अधीक्षक श्री. सतीश बाळके (पर्यवेक्षण अधिकारी), पोलीस निरीक्षक श्रीमती शैलजा शिंदे (सापळा अधिकारी) आणि अंमलदार प्रवीण तावरे, बाळासाहेब गदादे व अमोल वाघमारे.
लाचेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्वरित खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी पुणेतर्फे करण्यात आले आहे.
- पत्ता: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालय, सी बॅराक, सेंट्रल बिल्डिंग, पुणे – ४११००१.
- दूरध्वनी: (020) 26132802
- व्हॉट्सॲप नंबर: 9403781064, 1064


