
जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथील एका शेतजमिनीचे बनावट कागदपत्रे व बनावट खरेदीखत तयार करून, त्यावर तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्नर न्यायालयाच्या आदेशानुसार नारायणगाव पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी संतोष लक्ष्मण चिंचवडे (वय ४२, रा. शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष शिवाजीराव बढे, सौरभ संतोष बढे, पांडुरंग रखमा गुंजाळ, बाबाजी सखाराम घाडगे (सर्व रा. कांदळी, ता. जुन्नर), सुलोचना भास्कर खरे (रा. खांडगाव, ता. संगमनेर), प्रकाश देवराम काळे (रा. बोरी खुर्द, ता. जुन्नर), वंदना प्रकाश पाटील, राणी कुमार (दोघी रा. नाशिक) आणि भैरवनाथ नागरी पतसंस्था (चिंचोडी शाखा, मंचर) चे व्यवस्थापक रमेश खरमाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
एफ आय आर मधील तक्रारीनुसार, शिरोली तर्फे आळे येथील गट क्रमांक २२७ मधील १० एकर जमीन फिर्यादींचे कुटुंब १९७५ पासून कसत असून त्याचा ताबा त्यांच्याकडे आहे. या जमिनीबाबत दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना आणि मे २०२४ मध्ये वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध झाली असतानाही संशयितांनी कथितरीत्या फसवणुकीचा कट रचला. संशयित संतोष बढे व इतरांनी जमिनीच्या मूळ मालक कृष्णाबाई भतार विनायक यांच्या जागी सुलोचना खरे या महिलेचे बनावट आधारकार्ड तयार केले आणि दिनांक ०४ जून २०२४ रोजी जमिनीचे बनावट खरेदीखत नोंदवून घेतले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर संशयित संतोष बढे आणि त्यांचा मुलगा सौरभ बढे यांनी या कथित खरेदीखताच्या आधारे मंचर येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या चिंचोडी शाखेकडून जमिनीवर १ कोटी ५० लाख रुपयांचे गहाणखत करून कर्ज उचलले व फिर्यादीची फसवणूक केली असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर नारायणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण महादेव संपंगे हे या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
व्हिडीओ न्यूज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


