जाहिरात गवारी

आंबेगाव तालुक्यात कौटुंबिक वादातून सुनेला मारहाण; सासऱ्याविरुद्ध पारगाव पोलिसांत गुन्हा दाखल

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक व शेतजमिनीच्या वादातून एका विवाहित महिलेला भररस्त्यात अडवून तिच्याशी झटापट करत विनयभंग केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिचे सासरे सुखदेव दत्तात्रय आढाव (रा. लोणी, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

फिर्यादीत नमूद केलेल्या आणि मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला व तिचे पती लोणी येथील डोंगरभाग परिसरात कांदे भरण्याचे मजुरीचे काम करतात. आरोपी सासरे सुखदेव आढाव यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले असून, ते कुटुंबापासून वेगळे राहतात. तेव्हापासून त्यांचे फिर्यादी व त्यांच्या पतीसोबत शेतजमिनीच्या कारणावरून वारंवार वाद होत आहेत.

१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला आणि तिचे पती हे दोघे मौजे रानमळा (ता. आंबेगाव) येथून सविंदणे येथे कामाचे टोपले आणण्यासाठी मोटारसायकलवरून जात होते. दरम्यान, रानमळा-सविंदणे मार्गावरील हाडवळा येथील सरकारी विहिरीजवळ आले असता, समोरून बुलेट मोटारसायकलवरून आलेल्या सासऱ्यांनी पीडितेच्या गाडीसमोर आपली गाडी आडवी लावून त्यांना थांबवले.

गाडी थांबवून वाद घालत आरोपीने फिर्यादी महिलेला, “तुला लय शहाणपणा आलाय का? तू मध्ये पडू नको,” असे म्हणत अंगावर धावून जाऊन तिच्याशी झटापट केली. या झटापटीत फिर्यादी महिलेचा विनयभंग होईल असे कृत्य आरोपीने केले. फिर्यादीचे पती भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना आरोपीने जमिनीवर पडलेला मोठा दगड हातात उचलून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या दाम्पत्याने तेथून दुचाकीवरून पोलीस ठाण्याकडे पळ काढला. मात्र, पोलीस ठाण्यात जात असतानाही आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेने पारगाव पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी सुखदेव दत्तात्रय आढाव याच्याविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारगाव पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments