
प्रतिनिधी – विश्वजीत गवारी
शासकीय परवान्यांसाठी थेट ग्रामपंचायतीचेच खोटे शिक्के, बनावट लेटरपॅड आणि बोगस स्वाक्षऱ्या वापरून जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची डोळ्यात धूळ फेकणाऱ्या एका मोठ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीच्या नावाचा बनावट ठराव आणि ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लोणी येथील खडीक्रशर मालकावर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल संभाजी पडवळ (रा. सविंदणे, ता. शिरूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या खडीक्रशर मालकाचे नाव आहे.
या धक्कादायक प्रकाराबाबत लोणी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) संतोष बबनराव बोडरे रा. राजगुरुनगर यांनी पारगाव पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे.
‘असा’ उघड झाला ‘बनावट’ कारभार!
गुन्हा दाखल झालेल्या व मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल पडवळ याला मौजे लोणी गावच्या हद्दीत खाणकाम आणि खडीक्रशर सुरू करायचा होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा खणीकर्म विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (MPCB) परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळवण्यासाठी त्याने लोणी ग्रामपंचायतीचे २८ मार्च २०२१ चे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्रशासनाकडे सादर केले होते.
परंतु, पुणे जिल्हा परिषद आणि आंबेगाव पंचायत समितीकडून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणी ग्रामपंचायतीला एक चौकशी पत्र आले आणि या संपूर्ण बोगसगिरीचे धागेदोरे हाती आले.
रेकॉर्ड तपासले अन् ग्रामसेवकही चक्रावले!
पंचायत समितीच्या पत्रानंतर ग्रामपंचायत अधिकारी संतोष बोडरे यांनी तातडीने ग्रामपंचायतीचे जुने रेकॉर्ड आणि दप्तर तपासले. तेव्हा समोर आलेल्या माहितीने त्यांनाही धक्का बसला. ज्या २८ मार्च २०२१ च्या ग्रामसभेचा दाखला देऊन आरोपीने परवाना मिळवला होता, ती ग्रामसभा प्रत्यक्षात कोरम (गणसंख्या) पूर्ण न झाल्यामुळे तहकूब झाली होती! म्हणजेच, त्या दिवशी खडीक्रशरसाठी कोणताही ठराव मंजूर झालाच नव्हता. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्रामपंचायतीचे लेटरपॅड, खोटे शिक्के आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करून हा बोगस ठराव घरातच तयार केल्याचे उघड झाले.

पोलिसांची कडक कारवाई; परिसरात खळबळ
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतर पारगाव पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपी निखिल पडवळ याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ४७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या बोगस दाखल्याच्या प्रकरणामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील उद्योग क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, यामागे आणखी कोणाचे हात आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.


