
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
ग्रामसभेने खाणकाम आणि खडीक्रशर व्यवसायाला एकमुखाने नकार दिला असतानाही, थेट ग्रामपंचायतीचेच बनावट लेटरपॅड, खोटे शिक्के आणि सरपंच-ग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून उत्खननाची परवानगी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथील पेसा ग्रामपंचायतीची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी किरण गुलाब पोखरकर (रा. पोखरकरवाडी, ता. आंबेगाव) आणि जयदीप नितीन काळे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यासंदर्भात पिंपळगाव घोडे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) सुधीर अनिल चासकर (वय २५, रा. चास कमान, ता. खेड) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अर्ज मागे घेतला, तरीही बनवला बनावट ठराव
फिर्यादीत नमूद केलेल्या आणि मिळालेल्या माहितीनुसार, संशयित किरण पोखरकर आणि जयदीप काळे यांनी पोखरकरवाडी येथील जमीन गट नं. २३ मध्ये खाणकाम आणि क्रशर व्यवसायासाठी १ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायतीकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर २४ डिसेंबर २०२५ रोजी पोखरकरवाडी येथील हनुमान मंदिरात विशेष पेसा ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच २२ डिसेंबर रोजी किरण पोखरकर यांनी स्वतःहून आपला अर्ज मागे घेत असल्याचे लेखी लिहून दिले होते. २४ डिसेंबरच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या अर्जावर चर्चा करून ‘गावात कोणालाही खाणकामासाठी ना – हरकत दाखला (NOC) देऊ नये’, असा सर्वानुमते ठराव मंजूर केला होता.
मोबाईलवरील एका मेसेजने फुटले बिंग!
दरम्यान,दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसेवक सुधीर चासकर यांना त्यांच्या मोबाईलवर जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून सदर जमीन गट क्रमांकावर गौण खनिज उत्खनन परवान्याला मंजुरी मिळाल्याचे कागदपत्र दाखवले. हे पाहून ग्रामसेवक आणि सरपंच सायली लाडके चक्रावले. त्यांनी तात्काळ पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाकडून कागदपत्रे मागवून तपासली असता मोठा फेरफार समोर आला.
संशयितांनी ग्रामसभेने परवाना नाकारला असताना आणि अर्ज मागे घेतला असतानाही, पिंपळगाव घोडे ग्रामपंचायतीच्या बनावट लेटरपॅडवर पत्र तयार केले. त्यावर २४ डिसेंबरच्या ग्रामसभेत मंजुरी मिळाल्याचा खोटा उल्लेख करून ग्रामसेवक सुधीर चासकर आणि सरपंच सायली लाडके यांचे खोटे शिक्के व बनावट स्वाक्षऱ्या केल्या. हे बनावट दस्तऐवज तहसील कार्यालय आंबेगाव येथे खरे असल्याचे भासवून सादर केले व त्याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातून उत्खननाची अधिकृत परवानगी मिळवून शासनाची फसवणूक केली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ग्रामपंचायतीची आणि वरिष्ठ प्रशासनाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, गटविकास अधिकारी (BDO) पंचायत समिती आंबेगाव यांच्या आदेशानुसार घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. घोडेगाव पोलिसांनी किरण पोखरकर आणि जयदीप काळे यांच्याविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५), ३१८(४), ३३६(३), ३४०(२) आणि ३४१(२) अन्वये फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पिंपळगाव घोडे आणि लोणी येथील बोगस कारभाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार; राजकीय वरदहस्ताची चौकशी करण्याची प्रमोद बाणखेले यांची मागणी –
दरम्यान, आंबेगाव तालुक्यात एकापाठोपाठ एक अशा बोगस कारभाराची मोठी प्रकरणे समोर येत असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. तालुक्यातील पिंपळगाव घोडे आणि लोणी या दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी दोन खडी क्रेशर चालवण्यासाठी अशाच प्रकारे बोगस कागदपत्रे जोडल्याचे उघडकीस आले असून दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाचे प्रमोद बाणखेले यांनी आंबेगाव तालुक्यातील या भ्रष्ट व बोगस कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तालुक्यातील या सर्व बोगस प्रकरणांची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे असून, याप्रकरणी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात अधिकृत तक्रार करणार असल्याचे बाणखेले यांनी सांगितले. शासकीय यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या अशा सर्व दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगतानाच, हे खडी क्रेशर बेकायदेशीरपणे चालवणाऱ्यांच्या पाठीमागे नेमका कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का, याची देखील सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


