जाहिरात गवारी

अपघात झाला अन् थेट २.६० लाखांचा गांजाच बाहेर आला; बुलेटस्वार दोन इराणी तरुण पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी – विश्वजित गवारी
मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरवंडी गावाजवळ एक धक्कादायक आणि तितकाच फिल्मी थरार समोर आला आहे. एका बुलेटवरून आलेल्या दोन तरुणांनी पादचाऱ्याला जोराची धडक देऊन अपघात केला. अपघातानंतर पळून जाणाऱ्या या तरुणांना ग्रामस्थांनी पकडले असता, त्यांच्याकडे चक्क २ लाख ६० हजार रुपये किमतीचा तब्बल १० किलो ४०० ग्रॅम वाळलेला गांजा सापडला आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बुलेटसह ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अपघाताने उघड केले अंमली पदार्थांचे रॅकेट
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास दिलीप किसन तोत्रे रा. कुरवंडी हे पेठ ते घोडेगाव रोडने पायी चालले होते. दरम्यान, घोडेगाव बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या एका रॉयल एनफिल्ड गोरिल्ला बुलेटने (क्र. MH 12 XC 8511) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तोत्रे यांच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाली.

बॅग झाडीत फेकली, पण जागरूक नागरिकांनी पकडले
अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमू लागली. स्वतःला अडचणीत पाहून बुलेटवरील दोघांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या जवळील निळ्या रंगाची बॅग रस्त्याच्या कडेला झाडीत फेकून दिली. मात्र, कुरवंडी येथील ग्रामस्थांनी तत्परता दाखवत दोघांनाही जागीच पकडले आणि त्यांनी फेकलेली बॅग तपासली असता त्यात अंमली पदार्थ (गांजा) असल्याचे उघड झाले. ग्रामस्थांनी तात्काळ या घटनेची माहिती नवरात्र उत्सव बंदोबस्तात असलेले पोलीस हवालदार आढारी यांना फोनवरून दिली.

पुण्यातील दोघे ताब्यात; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत १० किलो ४०० ग्रॅम गांजा आणि २ लाख रुपयांची बुलेट असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी १) मेहंदी हसन कंबर इराणी (वय २४) आणि २) एक १६ वर्षीय अल्पवयीन संशयित तरुण (दोघे रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर, पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हा गांजा त्यांनी घोडेगाव येथील कथित इसम इलायबक्ष मुंढे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे संशयिताने सांगितले. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, मंचर पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments