जाहिरात गवारी

१२ महिने ‘डायरेक्ट’ वीज वापरली; महावितरणच्या फिरत्या पथकाने पकडली वीज चोरी, कथित ग्राहकावर मंचर पोलिसांत गुन्हा दाखल!

प्रतिनिधी- विश्वजित गवारी
मंचर शहरातील ‘समृद्धी कॉम्प्लेक्स’ परिसर एका मोठ्या आणि हायटेक वीज चोरीच्या प्रकरणामुळे चांगलाच हादरला आहे. महावितरणच्या विभागीय फिरत्या पथकाने (Special Unit) धाडसी कारवाई करत एका घरगुती वीज मीटरमधील अतिशय हुशारीने केलेली चोरी पकडली आहे. कथित वीज ग्राहकाने तब्बल १६१५ युनिटची वीज चोरून महावितरणला २० हजार ३४० रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा उघड झाला घरगुती मीटरमधील ‘खतरनाक खेळ’:
पोलीस आणि महावितरण कडून मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या फिरत्या पथकाचे प्रभारी सहाय्यक अभियंता श्री. विनोद शहाजी बळवंत आणि त्यांचे सहकारी मौजे गट क्र. १२१/३, गांजाळे मळा, समृद्धी कॉम्प्लेक्स येथील मीटर तपासणीसाठी गेले होते. तेथे कथित वीज ग्राहक अर्जुन हरिश्चंद्र वायकर यांच्या उपस्थितीत मीटरची बारकाईने तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान पथकाला मीटरच्या डिस्प्लेवर संशयास्पद ‘अर्थ’ (Earth) चे चिन्ह दिसले आणि पल्सेस पूर्णपणे बंद असल्याचे आढळले. मीटर बंद दिसत असूनही घरातील सर्व उपकरणे मात्र दिमाखात चालू होती. संशय बळावल्याने जेव्हा ‘मेन डिस्ट्रिब्युशन बॉक्स’ची सखोल तपासणी केली, तेव्हा पथकाचे डोळेच पांढरे झाले.

बायपास वायर टाकून थेट चोरी!
कथित आरोपीने मीटरमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून मीटरच्या बाजूला एक १६ ॲम्पिअरचा (16AMP MCB) वेगळा स्विच बसवला होता. काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या वायरींचा वापर करून मीटरला समांतर (Parallel) जोडणी करत वीज थेट घराच्या वापरासाठी ‘डायरेक्ट बायपास’ करण्यात आली होती. म्हणजेच, घरात वीज वापरली जात होती, पण मीटरमध्ये तिची कोणतीही नोंद होत नव्हती.

मुद्देमाल जप्त; पोलिसांत गुन्हा दाखल:
महावितरणच्या पथकाने पंचांसमक्ष वीज चोरीसाठी वापरलेले सात फुटांचे वायर, स्विच आणि संशयास्पद मीटर काढून कागदी सील लावून जप्त केले आहे. कथित ग्राहकाने गेल्या १२ महिन्यांत ही चोरी केल्याचे मूल्यांकन अहवालात समोर आले असून, तडजोड शुल्कासह एकूण २४ हजार ३४० रुपयांची रक्कम अद्याप भरलेली नाही.

याप्रकरणी सहाय्यक अभियंता बळवंत यांच्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात कथित आरोपी अर्जुन हरिश्चंद्र वायकर याच्याविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments